मी सक्षमा

महिला सक्षमीकरणासाठी मी सक्षमा!

Me Sakshama Program

"मी सक्षमा" महिला सक्षमीकरणासाठी

आजच्या स्त्रीला सशक्त आणि सशक्त बनवण्यासाठी “मी सक्षम” मोहिमेद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महिलांना समाजात मानाचे स्थान मिळाले पाहिजे. आजची स्त्री प्रगत आहे पण ती अधिक प्रवीण कशी व्हावी याचा विचार करत आहे.

महिलांमध्ये मानसिक ताण वाढून संतुलन बिघडणे अशा अनेक घटना समोर येत असतात. अशा वेळी “मी सक्षमा” द्वारे खास महिलांसाठी अनेक वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. कोविडच्या साथीमुळे झुम मीटिंगद्वारे यामध्ये चारशे ते पाचशेहुन अधिक महिला यामध्ये सहभागी होतात. रेसिपी शो, क्राफ्ट शो, कायदेशीर सल्ले, वुमेन्स हेल्थ अशा अनेक विषयावर यावेळी मार्गदर्शन केले जाते.

‘मी सक्षमा’ व महाराष्ट्र पोलीस अंतर्गत सांगली जिल्हा पोलीस कल्याण विभागतर्फे “मी सक्षमा जल्लोष” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. महिला पोलीस कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंब सदस्यांसाठी आयोजित या मनोरंजन कार्यक्रमात नृत्य, मिमिक्री, संगीत खुर्ची या कार्यक्रमाची रेलचेल असते. या कार्यक्रमामुळे त्यांना जीवनातील काही क्षण तरी आनंदात घालवता येतात व पोलिसांच्या मनावरील ताण-तणाव कमी होण्यास मदत होते.

खाद्यप्रदर्शन, महाहादगा, बचत गटांच्या महिलांनी बनवलेल्या विविध गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन “मी सक्षमा” च्या माध्यमातून राबवण्यावर नेहमीच भर देण्यात आलेला आहे. महिलांना शिक्षित, सक्षम आणि स्वयंपूर्ण बनविण्याचा उद्देश समोर ठेवून पुढील काळात ही “मी सक्षमा”च्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवण्यावर भर दिला जाणार आहे

"मी सक्षमा" अंतर्गत उपक्रम

रेसिपी शो

महिलांचा अगदी जवळचा व जिव्हाळ्याचा विषय म्हणजे विविध खाद्यपदार्थ तयार करणे. सतत नवनवीन खाद्यपदार्थ बनवायचे याचा खटाटोप करीत असताना महिला कधी थकत नाही. यासाठीच मी सक्षमा अंतर्गत रेसिपी शो चे आयोजन केले जाते. याअंतर्गत अनेक तज्ञ कुक व शेफ देखील महिला वर्गास उत्तम खाद्यपदार्थ कसे बनवावेत याचे अचूक मार्गदर्शन करतात.

क्राफ्ट शो

महिलांच्या अंगी विविध कलागुण असतात मात्र एकदा संसार सुरु झाला कि त्यांचे अनपेक्षितपणे याकडे दुर्लक्ष होते. यामुळे घरगुती वापराच्या अगदी लहान- लहान वस्तू घरच्या घरी तयार करता याव्यात यासाठी महिलांना त्रोटक माहिती असणे आवश्यक असते. क्राफ्ट शो च्या माध्यमातून अशा विविध वस्तू अगदी कमी वेळात कशा बनवाव्यात याचे सखोल ज्ञान मी सक्षमा अंतर्गत क्राफ्ट शो च्या माध्यमातून दिले जाते.

कायदेशीर सल्ला

लग्नापूर्वी तसेच लग्नानंतर प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यास महिलांना जीवन जगणे असह्य होऊन बसते. या काळात त्यांना महत्वपूर्ण असा कायदेशीर सल्ला मिळणे महत्वाचे असते. कायद्याचा आधार घेऊन प्रतिकूल परिस्थितीशी कसे दोन हात करावेत याबाबत मी सक्षमा अंतर्गत योग्य ते कायदेशीर सल्ले देण्यासाठी तज्ञ कायदेतज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते.

महिला आरोग्य कार्यक्रम

समाजातील रुढी, परंपरा, अंधश्रध्दा, वैद्यकीय सुविधांचा अभाव व वैयक्तिक आरोग्याकडे दुर्लक्ष इत्यादी कारणांमुळे महिला आरोग्य दृष्ट्या जोखीम गटात मोडतात. स्वतःच्या आरोग्याची काळजी न घेता कुटुंबाच्या आरोग्याकडे महिलांचे जास्त लक्ष असते यामुळे स्वतःचा आजार किती बळावत चालला आहे याची जाणीव महिला वर्गाला नसते. त्यामुळे मी सक्षमा अंतर्गत महिला आरोग्य शिबीर राबवून तसेच विविध आरोग्य जनजागृती संदर्भातील कार्यक्रम राबवून महिला सक्षमीकरणावर भर दिला जातो.

बचत गटांच्या महिलांनी बनवलेल्या विविध घरगुती वस्तूंचे प्रदर्शन

आज केवळ चूल व मूल या रहाट गाडग्यात आजची आधुनिक स्त्री गुरफुटून राहिलेली नाही. प्रत्येक स्त्री पिता, पती व पुत्र यांच्यावर अवलंबून न राहता स्वतः अर्थार्जन करण्यासाठी सिद्ध झाली आहे. बचत गटांच्या माध्यमातून स्त्रियांच्या विविधांगी कलागुणांना वाव मिळण्यासाठी 'मी सक्षमा' अंतर्गत महिलांनीच बनवलेल्या विविध घरगुती वस्तूंचे तसेच खाद्यपदार्थाचे प्रदर्शन भरवले जाते. या प्रदर्शनास नागरिकांचा देखील तितकाच मोठा प्रतिसाद असतो.

महिला पोलिसांसाठी ‘मी सक्षमा जल्लोष’ अंतर्गत विविध कार्यक्रम

महिला पोलीस या आपली कौटुंबिक जबाबदारी संभाळत नोकरी करीत असतात. या दोन्ही जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत असताना त्यांची दमछाक होत असते. या धकाधकीच्या जीवनात थोडासा विसावा व मनोरंजन महिला पोलिसांसाठी आवश्यक आहे. त्यामुळे 'मी सक्षमा जल्लोष' अंतर्गत मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याद्वारे महिला पोलिसांच्या अनेक सुप्त गुणांना वाव दिला जातो.

महिला सबलीकरणासाठी "मी सक्षमा"