देशाचं राजकारण व स्मार्ट तरुणाई उदाहरण कोणत्याही देशाचे घ्या त्या देशाच्या एकूणच जडणघडणीत आणि विकासात तरुणांचे योगदान महत्त्वपूर्ण असते. देशातील कोणताही मोठा पेच प्रसंग असो, एखादी राजकीय उलथापालथ असो त्यामध्ये युवक कोणती भूमिका बजावतात यावर सर्व काही अवलंबून असतं. भारताच्या स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्रोत्तर काळातील अनेक सामाजिक चळवळीत सक्रिय सहभागातून तरुणांनी आपली कार्यक्षमता दाखवून दिली आहे. देशातील चालू वर्तमानाचा विचार केला तर सोशिअल मीडियाचा वापर करून आजची यंग ब्रिगेड आंदोलन आणि क्रांतिकारी मोर्चे यात सहभागी होऊन ते आंदोलन पुढे नेण्याचे काम करताना दिसत आहे. आजचा तरुण वर्ग हा भूमिका घेण्यात ठाम आहे. मात्र देशातील भ्रष्टचाराविरुद्ध आणि अराजकीय प्रवृत्तीविरोधात आजच्या तरुणाईला काँग्रेस मार्गदर्शक ठरतेय. तरुणाई मध्ये देशाचे भविष्य आणि वर्तमान घडवण्याची प्रचंड क्षमता असते. या क्षमेतला एक सकारात्मक ऊर्जा देण्याचे कार्य काँग्रेस करत आली आहे. पण देशात काही संस्था, संघटना व भाजप सारखा राजकीय पक्ष सुद्धा आजच्या तरुण पिढीला जात, धर्म आणि प्रदेशाच्या नावावर भडकवून त्यांना संकुचित मनोवृत्तीखाली आणून विध्वंसाकडे नेण्याचं काम करत आहेत. हे आजच्या स्मार्ट तरुणाईसाठी खूप घातक आहे. महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा तरुण वर्ग खूप मोठा आहे. त्यांच्या नावावर काही संस्था आणि समाजकंटक या तरुण वर्गाला भडकविण्याचे व दुही माजवण्याचा काम करत असतात. पण तरुणांनी या लोकांपासून नेहमीच दूर असले पाहिजे, भलेही ते आपल्या जातीचे असो अथवा धर्माचे असो..! आजचा तरुण स्वतःला इतरांपेक्षा वेगळा समजतो. त्याची मानसिकता वैश्विक स्वरूपाची व विस्तीर्ण आहे. नेहमी कार्यमग्न राहण्यासाठी आपण ऑनलाईन राहिलो की सर्व काही झालं अशा मानसिकतेत आजचा तरुण आहे. पण हे सर्व करीत असताना आपण कोणाला फॉलो केलं पाहिजे, कोणाचे आदर्श धडे गिरवले पाहिजेत याची शहानिशा करून त्याने मार्गक्रमण केले पाहिजे. स्मार्टनेस आणि झगमगाट या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत याचे भान ठेवून आजूबाजूला घडणाऱ्या राजकीय, सामाजिक घडामोडींविषयी विचारमंथन करून स्वतःची भूमिका ठामपणे मांडता आली पाहिजे.
![]()

